अभियांत्रिकी मधील करिअर भविष्यात कौशल्याधिष्ठित असणार - डॉ. मोहन वनरोट्टी

अभियांत्रिकी मधील करिअर भविष्यात कौशल्याधिष्ठित असणार - डॉ. मोहन वनरोट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आज परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी ‘अभियांत्रिकी मधील करिअर व केंद्रीय प्रवेश प्रक्रिया’ या विषयातील मोफत मार्गदर्शनाचा कार्यक्रम किमान ११००विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदललेले नियम व पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण अंकांचे निरसन या कार्यक्रमातून करण्यात आले आहे. अभियांत्रिकी मधील करिअर भविष्यात कौशल्याधिष्ठित असणार असे प्रतिपादन संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी यावेळी केले. 

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. संस्थेचे विश्वस्त सुनील कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीचा अत्यंत मोजक्या शब्दात आढावा घेतला. संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी अभियांत्रिकी मधील विविध अभ्यासक्रमातील करिअरच्या विविध संधींबाबत अत्यंत समर्पक शब्दात मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले," उद्योग क्षेत्रातील तांत्रिक बदल हे अत्यंत जलद गतीने होत आहे. अनेक उद्योग क्षेत्रे बहुविद्याशाखीय झालेली आहेत. संगणक क्षेत्राबरोबरच स्थापत्य, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, पर्यावरण या सर्व अभियांत्रिकी विभागांना एकाच छताखाली अथवा उद्योग क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. केंद्रीय व राज्य शासनाच्या विविध पॉलिसीमुळे नोकऱ्यां प्रमाणेच स्टार्टअप्स च्या माध्यमातून नवउद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या संधींच्या माध्यमातून तरुण अभियंते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीमध्ये योगदान देत आहेत."

डॉ. वनरोट्टी पुढे म्हणाले की, सर्वच अभियांत्रिकी विद्या शाखांमध्ये सम प्रमाणात करिअरच्या संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनीही आपल्या पाल्याच्या क्षमता ,आवड व भविष्यातील करिअरची क्षेत्रे याबाबत विचार करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे आवाहन केले.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता ,अॅडमिशन डॉ.महेश शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाच्या अशा केंद्रीय प्रवेश प्रक्रिये बाबत मुद्देसूद माहिती विद्यार्थ्यांना पालकांना दिली. अॅडमिशन प्रोसेसमध्ये असणारे विविध टप्पे जसे नोंदणी, कागदपत्र पडताळणी, ऑप्शन फॉर्म भरणे, सीट एक्सेप्टन्स, बेटरमेंट, इत्यादी. हे करत असताना येणाऱ्या अडचणी व घ्यावयाची काळजी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही किंवा आपली एक चूक आपल्या करिअरला महागात पडणार नाही यावरती मार्गदर्शन केले.तसेच या वर्षी पासून होणारे मोठे बदल म्हणजे पहिला राऊंडला पहिला ऑप्शन सक्तीचा असेल दुसऱ्या राऊंडला पहिले तीन ऑप्शन्स सक्तीचे असतील व तिसरा राऊंडला पहिले सहा ऑप्शन्स सक्तीचे असतील व चौथ्या राऊंडला सर्व ऑप्शन सक्तीचे असतील.अंतिम सत्रात विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुती काशीद यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.अमर टिकोळे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले.

यावेळी संस्थेचे विश्वस्त भरत पाटील, रजिस्ट्रार ,सर्व विभाग प्रमुख व सर्व ऍडमिशन टीम मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.