आंतरराष्ट्रीय मानसशास्त्र परिषदेसाठी डॉ. जगन कराडे फिलिपाईन्सला रवाना

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय मानसशास्त्र काँग्रेसच्या वतीने दि. २१ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फिलिपाईन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. जगन कराडे रवाना झाले आहेत.
फिलिपाईन्स ग्लोबल सिटीमधील नॅशनल युनिव्हर्सिटी, क्लर्क येथे ‘दि इव्हॉल्व्हिंग लँडस्केप ऑफ मेंटल हेल्थ: ग्लोबल अनोव्हेशन्स इन असेसमेंट, ट्रीटमेंट अँड ट्रेन्ड्स’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेतील ‘जागतिक मानसिक आरोग्य’ या विषयावरील परिसंवादात ‘मानसिक आरोग्य आणि सामाजिक असमानता’ या विषयावर बोलण्यासाठी डॉ. कराडे यांना विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले आहे.
डॉ. जगन कराडे यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर १५ संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले असून यातील दोन ग्रंथ लंडनच्या केब्रिंज पब्लिकेशन्सकडून प्रकाशित झाले आहेत. त्यांनी यापूर्वी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), टोरँटो (कॅनडा), तैपेई (तैवान), मलेशिया आणि दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र परिषदांमध्येही सहभागी होऊन मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले असून राज्य पातळीवरील मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.