‘कायम उपमुख्यमंत्री’... संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

‘कायम उपमुख्यमंत्री’... संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला.तीन महिन्यांपूर्वीच लोकसभा  निवडणुकीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीसाठी या निवडणुकीचे निकाल धक्का देणारे ठरले. महायुतीने मात्र या निवडणुकीत बाजी मारली.सर्वाधिक जागा महायुतीने जिंकत सत्ता स्थापन करण्याची तयारी केली आहे. गेले तीन दिवस महायुतीत बैठकांवर बैठका होत आहेत. महत्वाच्या खात्यांवर विचारविनिमय झाले असून केवळ मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. महायुतीसाठी या निवडणुकीचा निकाल म्हणजे एक सुखद धक्काच होता. विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी हा निकाल खूपच समाधानकारक होता. 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीत सर्वात कमी म्हणजे ५५ जागा लढवल्या पण तब्बल ४१ जागांवर त्यांना विजय मिळाला. अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातही बऱ्यापैकी मताधिक्य मिळाले. या विजयानंतर आता अजित पवारांचा सार्वजनिक जीवनातला वावर बदलल्याचे पाहायला मिळत आहे. निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दर्शविणे असो किंवा दिल्लीचा दौरा असो, बदललेले ‘अजितदादा’ नजरेस पडत आहेत. यावर आता संजय राऊत यांनीही शाब्दिक कोटी केली असून ‘कायम उपमुख्यमंत्री’ असा त्यांचा उल्लेख करत संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला.

काय म्हणाले संजय राऊत ?

दिल्ली येथे बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे कायम उपमुख्यमंत्री आहेत. ते भावी किंवा माजी नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री असतात. हे कौतुकास्पद आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पाहायला मिळत आहे. दिल्लीत ते गॉगल बिगल लावून, कोट घालून फिरत आहेत. खरंतर त्यांचे हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळले होते. पण आता ते खूश दिसत आहेत.

संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेनाही टोला 

एका बाजूला अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला आहे. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “उगवता सूर्य आणि मावळती सूर्य यात फरक असतोच. उगवत्या सूर्याचे तेज एका बाजूला दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य आहे. मावळतीचा सूर्य झुकताना, वाकताना आणि ढगाच्या आड जाताना दिसत आहे. शेवटी हे राजकारण आहे. ते चंचल असते, त्यात काय होईल? हे सांगता येत नाही.”