‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कोल्‍हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गोकुळ प्रधान कार्यालयामध्ये महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या  कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे हस्ते व संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, कॉ.स्मिता पानसरे व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, ज्या घरात स्त्रीला सन्मान मिळतो तिचे नैसर्गिक हक्क तिला दिले जातात त्या घरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदते. कारण स्त्री हीच आई, बहिण, पत्नी, मैत्रीण अशा अनेक रुपात पुरुषांना आणि समाजाला उर्जा आणि प्रेरणा देत असते. सबला आणि सक्षम स्त्रिया हे निरोगी समाज व्यवस्थेचे लक्षण आहे. असे उद्गार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी काढले. तसेच यावेळी डोंगळे यांनी कॅन्सर वर मोफत मिळणाऱ्या लसीकरणाची माहिती देऊन लसीकरण करण्यासाठी उपस्थित महिला व युवतींना लिस्टमध्ये नाव देण्याचे आव्हान केले व हा कार्यक्रम गोकुळ मध्ये घेतला जाईल असे सांगितले व इथून पुढे गोकुळ दूध संघामध्ये आठ मार्चला कार्यक्रम घेतला जाईल असे नमूद केले.

यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या महिला फेडरेशनचे अध्यक्ष कॉ.स्मिता पानसरे यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याची माहिती सांगितली तसेच स्त्रियांनी आपली वैचारिक क्षमता वाढवण्यासाठीचे मार्गदर्शन केले.

तसेच अतिरिक्त पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी महिलांना डोमेस्टिक वायलन्स यावर प्रबोधन केले. महिलांनी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे. पोलिसांकडे योग्य ते समुपदेशन मिळू शकते याचीही माहिती दिली. निर्भया पथकाची माहिती देऊन महिलांनी धाडसाने वागावे, १८ वर्षे झाल्याशिवाय मुलीचे लग्न करू नये याविषयी तसेच मोबाईल व टीव्ही याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठीचे मार्गदर्शन केले.

तसेच डॉ.रेश्मा पोवार यांनी उपस्थित महिलांना सर्वाइकल कॅन्सर यावर मार्गदर्शन करून व महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळावे व पैसा स्वतःच्या आरोग्यासाठी राखून ठेवावा असे आव्हान केले. उपस्थित महिलांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंकेचे निरसन करण्यात आले.   

यावेळी गोकुळ प्रधान कार्यालयामध्ये महिला दिनानिमित्त गोष्ट एका तासाची ही नाटिका सादर करण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या प्रागंणामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध प्रबोधनात्मक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी गोकुळ दूध संघ कर्मचारी व अधिकारी त्यांच्या सौभाग्यवती व कन्या उपस्थित होत्या.

 या कार्यक्रमाचे स्वागत मृण्मयी सातवेकर व प्रास्ताविक संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी तर संघटनेचे अध्यक्ष मल्हार पाटील यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करत असताना संघातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान व सहकार्य केले.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालिका अंजना रेडेकर, कॉ.स्मिता पानसरे, अतिरिक्त पोलीस प्रमुख जयश्री देसाई, डॉ.रेश्मा पोवार, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील, महिला नेतृत्व विकास प्रमुख मृण्मयी सातवेकर, संपदा थोरात, माधुरी बसवर, राजश्री चव्हाण, रुपाली देसाई, निलम कवठेकर, गीता मोरे, डॉ.अश्विनी टारे, सुनिता कांबळे, शुभदा पाटील तसेच, बाजीराव राणे, संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम इतर सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.