जांभळाच्या झाडावरून एकाचा जागीच मृत्यू जांभूळ खाण्याचा मोह बेतला जीवावर

जांभळाच्या झाडावरून एकाचा जागीच मृत्यू जांभूळ खाण्याचा मोह बेतला जीवावर

राधानगरी प्रतिनिधी निवास हुजरे

कपिलेश्वर - मांगोली मार्गावरील ओढ्याजवळ असणाऱ्या जांभळाच्या झाडावरून पडून सुरज भाऊसो पाटील (वय ३०, रा.इंगरुळ ता. बत्तीसशिराळा, जि. सांगली ) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रवासी भाडे घेऊन सूरज भाऊसो पाटील मांगोली ता. राधानगरी येथे आले होते. प्रवाशांना सोडून परत जाताना गावाशेजारील मांगोली ओढ्याजवळ असणाऱ्या जांभळीच्या झाडावर जांभळे तोडण्यासाठी ते झाडावर चढले होते. मात्र जांभळाचा मोह त्यांच्या जीवावर बेतला. झाडाची फांदी तूटून ते ओढ्याच्या आरसीसी कठड्यावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन ते पाण्यात पडल्याने बुडून त्यांचा जागीच मॄत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, कृष्णात यादव, प्रवीण गुरव,पोलीस पाटील वसुधा पाटील, मानसिंग काटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरा नातेवाईक आले. सहा महिन्यापूर्वी सूरजचे लग्न झाल्याचे समजते. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. सुरजच्या अशा अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.