पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी उठल्यामुळे मूर्तिकारांना मिळाला दिलासा

पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी उठल्यामुळे मूर्तिकारांना मिळाला दिलासा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींवरील बंदी हटवली असून, या मूर्तींसाठी नैसर्गिक रंग वापरण्याची शिफारस काकोडकर अहवालात करण्यात आली आहे. तसेच, या मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम कुंडातच करण्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीड हजार मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोल्हापुरात दरवर्षी साडेतीन ते चार लाख घरगुती व सव्वा लाख सार्वजनिक गणेशमूर्ती तयार होतात. हे काम अनेक मूर्तिकार व त्यांच्या कुटुंबियांनी गणेश चतुर्थीच्या सहा महिने आधीपासून सुरू केलेले असते. शहरातील पापाची तिकटी, कुंभार गल्ली, शाहूपुरी, बापट कॅंप तसेच उपनगरातील कुंभारवाडा या भागांमध्ये मूर्ती निर्मितीचा जोर असतो. उपलब्धते अभावी शाडू मातीची किंमत जास्त असून त्यामुळे बहुतांश 90 टक्के मूर्ती पीओपीपासून बनवल्या जातात.

न्यायालयाने पीओपी मूर्तींना परवानगी देताना पर्यावरणपूरक विसर्जनाचे निकष लागू केले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून कोल्हापुरात पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संस्थांच्या पुढाकारातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची चळवळ सुरू आहे. कृत्रिम कुंड, घरातील बादली किंवा बागेत विसर्जन करून नागरिक सण साजरा करत आहेत. या सकारात्मक बदलाला न्यायालयाच्या निर्णयामुळे आणखी बळ मिळाले आहे.