शाहूवाडी तालुका ‘पर्यटन विकास समिती’ची बैठक संपन्न
शाहूवाडी तालुका ‘पर्यटन विकास समिती’ची बैठक संपन्न

रोहित पास्ते / मलकापूर प्रतिनिधी
सह्याद्रीची संपन्न जैवविविधता, प्राचीन व शिवकालीन इतिहास, ग्रामीण संस्कृती आणि कृषी पर्यटन असे चौफेर पदर शाहूवाडीचे पर्यटन समृद्ध करणारे आहे. तालुका पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून येथील पर्यटनाला नवा आयाम दिला जाईल असा विश्वास पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी व्यक्त केला. शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित तालुका पर्यटन विकास समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.
शाश्वत पर्यटनासाठी शाहूवाडीचा ब्रन्ड तयार करण्याची गरज : प्रमोद पाटील
हिल रायर्डसचे प्रमुख प्रमोद पाटील म्हणाले, साहसी पर्यटनासाठी येथे सुरक्षित जागा निश्चित करून तरूणाईला आकर्षित करता येईल. शाश्वत पर्यटनासाठी शाहूवाडीचा ब्रन्ड तयार करण्याची गरज आहे. प्रेक्षणिय ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून . ठिकठिकाणी माहीती फलक उभारावे लागतील.
कोल्हापूर विभाग अधिस्वीकृती समिती अध्यक्ष सुखदेव गिरी म्हणाले,जंगल संपदा मुबलक आहे.सडे,जलाशय जैवविविधतेने परिपुर्ण आहेत.कृषी पर्यटनास मोठी संधी आहे .स्थानिक तरूणांना गाईड प्रशिक्षण देवून शिस्तबद्धता आणता येईल.
विषय तज्ञ राजेंद्र लाड म्हणाले, तालूक्याच्या सिमा देवरायांचा ठेवा जपून आहेत.त्यांच्या सुधारणासह परीसरातील धबधबे, जलाशय सुरक्षित करून वर्षा व ऋतू पर्यटन परीपूर्ण करता येईल.
विषय तज्ञ विनोद कंबोज म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात सुट्टीतील पर्यटन वाढत आहे पण अन्य काळात या उद्योगात स्थिरता येण्यासाठी अन्य क्षेत्रातील पर्यटकांना येथे आकर्षित करणारी सहल पकेज द्यावे लागेल.दोन दिवस पर्यटक येथे समाधानाने निसर्गाशी एकरूप होईल अशी साखळी उभारता येईल.
स्वराज्य फाउंडेशनचे डॉ झुंजार माने यांनी आडवाटेवरची नवीन निसर्ग रम्य ठिकाणे सुचवून ट्रेकिंग मार्ग, पर्यटन महोत्सव, स्वच्छता उपक्रम यामाध्यमातून जागृतीची गरज मांडली.
पर्यटन सल्लागार प्रमोद माळी यांनी घाटमाथ्यावरील समृद्ध सडे, पांडवकालीन मंदिरे, जंगल वाचन व जंगल सफारी यांचे मार्केटिंग आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
आंबा, मानोली, केर्ले, परळेनिनाई, ठाणेवाडी, उदगिरी, पावनखिंड,पांढरे पाणी, येळवण जूगाई, बर्की, अणूस्करा, सातेरी मंदिर, कांडवण, उगवाई देवी मंदिर अनुस्कूरा, खोत वाडी, सोनुर्ले (धोंडेवाडी) धोपेश्वर-ऐनवाडी, गेळवडे जलाशय या रमणीय व संपन्न इतिहासाचा वारसा जपलेल्या गावांतून पर्यटन विषयक विकास आराखडा उभारून तालूक्यात रोजगार निर्मितीला चालना देणारी भूमिका बैठकीत ठरविण्यात आली. दरमहा शेवटच्या आठवड्यात तालूका समितीची बैठक घेऊन प्रगती अहवाल जिल्हाधिकारी राहूल रेखांवर यांना सादर करण्याचे ठरले.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, आचल बगाडे,,तालूका वैद्यकीय अधिकारी आर. एच. निरंकारी, मलकापूरच्या मुख्याधिकारी,अवधी डोंणगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा सुतार इरिगेशन, कृषी, पाटबंधारे, वन, सामाजिक वनीकरण विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी मानले.