Operation Sindoor : कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह? नारीशक्तीवर सरकारने सोपवली मोठी जबाबदारी

Operation Sindoor : कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह? नारीशक्तीवर सरकारने सोपवली  मोठी जबाबदारी

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तान आणि POK मध्ये घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात जवळपास 90 दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. भारतीय सैन्याने या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली. विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारत सरकारसह संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा पर्दाफाश केला. 

भारतीय सैन्याने बुधवारी (7 मे) सकाळी 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ही माहिती दिली. 

कोण आहेत सोफिया कुरेशी?

कर्नल सोफिया कुरेशी या धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पुणे येथे झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास 'एक्सरसाइज फोर्स 18' मध्ये त्यांनी भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. असे करणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. पुण्यात 2 मार्च ते 8 मार्च दरम्यान झालेल्या या युद्ध सरावात 18 देशांनी भाग घेतला होता. यात ASEAN सदस्य देशांसोबत जपान, चीन, रशिया, अमेरिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश होता. सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातही सैन्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा लष्करात होते. तर, सोफिया यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. 

विंग कमांडर व्योमिका सिंह कोण?

विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं लहानपणापासूनच भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं स्वप्न होतं. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांना धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अडीच हजार तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवले आहे. व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू-काश्मीरसारख्या कठीण प्रदेशात चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडवले आहेत. त्यांनी अनेक बचाव कार्यांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एका कठीण बचाव कार्याचे नेतृत्व केले होते आणि लोकांचे प्राण वाचवले होते.