Pahalgam Terror Attack : कोण आहे हा सैफुल्ला खालिद कसुरी ?

Pahalgam Terror Attack : कोण आहे हा सैफुल्ला खालिद कसुरी ?

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामजवळील "मिनी स्वित्झर्लंड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात २२ एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे. 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, यामागे सैफुल्ला खालिद याचा मुख्य हात असल्याचं उघड झालं आहे.

सैफुल्ला खालिद, ज्याला सैफुल्ला कसुरी नावानेही ओळखलं जातं, हा लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख असून, आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदचा निकटवर्तीय मानला जातो. आलिशान जीवनशैली आणि उच्च सुरक्षा व्यवस्था असलेला सैफुल्ला, आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या गटांच्या सहवासात असतो. त्याचं पाकिस्तानात VVIP प्रमाणे स्वागत केलं जातं, लष्करी अधिकारीही त्याला मान देतात.

दोन महिन्यांपूर्वी, पाकव्याप्त पंजाबमधील कंगनपूरमध्ये सैफुल्लाने भारतविरोधी तीव्र भाषण केलं. या कार्यक्रमात पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही सहभागी होते. नंतर खैबर पख्तूनख्वामधील एका गुप्त बैठकीत त्याने २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याची धमकी दिली. या बैठकीत आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाने उघडपणे शस्त्रधारी दहशतवादी गोळा झाले होते.

दरम्यान, अबोटाबादजवळ जंगलात लष्करने एक गुप्त प्रशिक्षण केंद्र उभारलं आहे, जिथे सैफुल्लाने युवकांना भारतविरोधात भडकावलं जातं . त्यांना टार्गेट किलिंग आणि घुसखोरीसाठी प्रशिक्षित केलं जात आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदचा उजवा हात 

कलम ३७० हटविल्यानंतर आयएसआयने TRF या संघटनेची स्थापना केली. ही संघटना थेट लष्करच्या निधीतून चालते. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ आणि लष्कराच्या इतर शाखांच्या माहितीनुसार, सैफुल्ला खालिद हा केवळ TRF चा नेता नसून, भारतासाठी धोका निर्माण करणाऱ्या हाफिज सईदचा उजवा हात आहे. पहलगाम हल्ल्यामुळे तो पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे.