ठाकरे गटाचा आणखी एक नेता चौकशीच्या भोवऱ्यात

खिचडी घोटळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याची चौकशी

ठाकरे गटाचा आणखी एक नेता चौकशीच्या भोवऱ्यात
खिचडी घोटळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याची चौकशी

माझा महाराष्ट्र / वेब टीम

कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आधीपासूनच ठाकरे गटाच्या काही नेत्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता खिचडी घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत. अशातच ठाकरे गटाचा आणखी एक नेता आता चौकशीच्या भोवऱ्यात अडकला आहे.

खिचडी घोटळा प्रकरण

कोरोना काळात गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत स्वत:चे घर नाही अशा लोकांना जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मुंबई महानगरपालिकेने 52 वेगवेगळ्या कंपन्यांना या खिचडी वाटपाचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. परंतु या योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच प्रकरणी आता मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. 

या आधी या लोकांवर गुन्हा दाखल 

या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने याआधी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट मोठ्या अडचणीत सापडता दिसत आहे.