करिअर अकॅडमीत १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
शाहूवाडी तालुक्यातील एका करिअर अकॅडमीत १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

माझा महाराष्ट्र / वेब टीम
शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथील राजर्षी शाहू करिअर अकॅडमीमध्ये एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याप्रकरणी अकॅडमीच्या संचालकाविरुध्द शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बळीराम लोकरे असे संशयित संचालकाचे नाव आहे.
आपल्याला खोलीत झोपायला बोलवून पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने संशयिताने जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच या घटनेची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचे पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यावेळी फिर्यादी मुलाकडे अधिक चौकशी केल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समोर आले. याबाबत शाहूवाडी पोलिसांना सखोल चौकशीच्या सूचना दिल्या. त्यानुसार अकॅडमीचे संचालक संजय लोकरे याला सोमवारी रात्री उशिरा अटक करत त्याच्याविरुध्द बाल लैंगिक अत्याचार आणि अनुसुचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.