इलेक्ट्रिक वाहनांना महाराष्ट्राची पॉवर...

इलेक्ट्रिक वाहनांना महाराष्ट्राची पॉवर...

देशात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या देशात जवळपास २८ कोटी वाहने असून ती पेट्रोल- डिझेलवर धावतात. वाढत्या वाहन वापरामुळे देशात वायुप्रदूषणाचे संकट ओढावत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतात. यामध्ये सरकारकडून वीजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर कमी जीएसटी, कमी मेंटेनन्स, कमी खर्चाचे असल्यामुळे नागरिकांमध्ये वीजेवरील वाहनांच्या वापराचे प्रमाण वाढू लागले आहे. देशभरात सुमारे १२ हजार १४६ चार्जिंग स्टेशन आहेत तर एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक ३ हजार २१६ चार्जिंग स्टेशन आहेत. वाहने चार्जिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचा विचार करता देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.