कोल्हापूर विमानतळावरून आता बेंगळुरू आणि हैदराबादसाठीही स्टार एअरवेजची सेवा सुरू

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळावरून दिल्या जाणाऱ्या हवाई सेवांमध्ये आता आणखी दोन शहरांची भर पडली आहे. स्टार एअरवेजने बेंगळुरू आणि हैदराबादसाठी नवीन विमानसेवा सुरू केली असून, यामुळे कोल्हापूरच्या हवाई सेवेचा आणखी विस्तार झाला आहे. यापूर्वी स्टार एअरवेजकडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद आणि मुंबईसाठी सेवा चालवली जात होती. आता इंडिगोच्या जोडीला स्टार एअरवेज देखील बेंगळुरू आणि हैदराबाद मार्गांवर प्रवासी वाहतूक करणार आहे.
ही सेवा १५ मे पासून सुरू होत असून, हैदराबादसाठी दर मंगळवार व बुधवार आणि बेंगळुरूसाठी मंगळवार, बुधवार व रविवार अशा दिवशी उड्डाण केले जाईल. हैदराबादहून सकाळी ९:३५ वाजता विमान उड्डाण करेल आणि १०:४० वाजता कोल्हापुरात पोहोचेल. दुपारी ३ वाजता कोल्हापुरातून परतीचे उड्डाण होऊन ४:०५ वाजता हैदराबादमध्ये आगमन होईल. बेंगळुरूसाठी कोल्हापुरातून सकाळी ११:०५ वाजता उड्डाण होऊन १२:३५ वाजता पोहोचेल, तर परतीचे विमान दुपारी १:०५ वाजता उड्डाण करून २:३५ वाजता कोल्हापुरात दाखल होईल.
खासदार धनंजय महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचा विकास आणि सेवांचा विस्तार वेगाने होत आहे. या हवाई सेवा कृषी, उद्योग, पर्यटन तसेच आयटी आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहेत. कोल्हापूरचा देशातील प्रमुख शहरांशी संपर्क अधिक मजबूत होत असून, त्यामुळे संपूर्ण परिसराचा आर्थिक विकास वेग घेणार आहे.