दक्षिणी कमानच्या वतीने कॅप्टन उत्तम पाटील यांना "व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड

कोल्हापूर : गढवाल रायफल्सच्या ७ व्या बटालियनचे निवृत्त कॅप्टन उत्तम पांडुरंग पाटील यांना पुणे येथे भारतीय सेनेच्या दक्षिणी कमान मुख्यालयात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये दक्षिणी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ परम यांच्या हस्ते 'व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्डने' गौरवण्यात आले.
कॅप्टन उत्तम यांनी भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रसेवा, समाजसेवा, पर्यावरण जनजागृती व महिला सक्षमीकरणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. तसेच युवा मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राद्वारे ग्रामीण भागातील गरीब होतकरू तरुणांना चांगले शिक्षण व रोजगार निर्मितीचे कार्य सुरु ठेवले आहे.
आज अखेर त्यांनी स्व-व्यवसायाच्या माध्यमातून १२ राज्यातील सुमारे ४००० आजी-माजी सैनिक व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केलेल्या आहेत.कोणत्याही प्रकाराचा बडेजाव न करता फक्त अन फक्त समाजसेवा करण्यात मग्न असणाऱ्या पाटील यांच्या कार्याची दखल या आधी दैनिक पुढारी, लोकमत यांनीही घेऊन त्यांना गौरविले आहे.
गेली सतरा वर्षापासून अयोध्या फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक सेवेत सक्रिय असणाऱ्या कॅप्टन उत्तम पाटील यांना उत्कृष्ट सेवेबद्दल भारतीय सेनेच्या दक्षिणी कमानकडून प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी गढवाल रायफल्सचे मेजर जनरल एस. एस. विर्क, दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अनुराग विज, सातव्या गडवाल रायफलचे सेवानिवृत्त सेना मेडल कर्नल गिरीधर कोले, सेवानिवृत्त कॅप्टन अनिरुद्ध बागाईतकर, ४१ आर्टिलरी डिव्हिजनचे जनरल ऑफिसर तसेच दक्षिण कमांडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.