शिवाजी विद्यापीठाचा ऋषीप्रसाद देसाई स्पर्धेतील वेगवान धावपटू

शिवाजी विद्यापीठाचा ऋषीप्रसाद देसाई स्पर्धेतील वेगवान धावपटू

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत विद्यापीठाच्या ऋषीप्रसाद देसाई याने स्पर्धेतील वेगवान धावपटूचा किताबही मिळविला. विद्यापीठाच्या 4X400 मीटर रिले पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच महिला बास्केटबॉल संघानेही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात १८ फेब्रुवारीपासून २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवातील मैदानी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ऋषीप्रसाद देसाई याने १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. त्याने सुवर्णपदकासह या स्पर्धेतील वेगवान धावपटूचा किताब मिळवला. उंच उडीत समीक्षा अडसूळ हिने १.५५ मीटर उडी मारून सुवर्णपदक मिळवले. धैर्यशील गायकवाड याने २.०० मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक तर अथर्व धज याने १.९० मीटर उडी मारून रौप्य पदक मिळवले. तितिक्षा पाटोळे हिने १०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळविला.

गोळाफेकीत ऋषिकेश साखरे याने १५.३६ मीटर फेक करत द्वितीय क्रमांक मिळविला. प्रफुल्ल थोरात याने १४.५१ मीटर फेक करत तृतीय क्रमांक मिळविला. थाळीफेकीत निकिता शेवाळे हिने ३४.०२ मीटर फेक करत प्रथम क्रमांक मिळविला.

बॅडमिंटनमध्ये विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने आज सकाळच्या सत्रात अमरावतीच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या संघावर २-० असा विजय मिळवला. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात मुंबईच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठावर २-० असा विजय मिळवला. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठावरही २-० असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला.

टेबल टेनिस (पुरुष) स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघाने बलाढ्य नागपूरच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला बास्केटबॉल संघाने उपांत्य फेरीत मुंबई विद्यापीठावर ५१-३९ असा १२ गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

सर्व खेळाडूंना पथक प्रमुख डॉ. एन.डी. पाटील, प्रशिक्षक डॉ. सुनिल चव्हाण, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. संजय पाटील, डॉ. आकाश बनसोडे, डॉ. श्रीदेवी पवार, डॉ. गणेश सिंहासने, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रमेश पाटील, डॉ. संदीप पाटील, रुद्रेश शिवपूलजी आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.