स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये महानगरपालिकेची राष्ट्रीय स्तरावर 129 वरुन 66 व्या क्रमांकावर भरारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्या स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 अंतर्गत देशभर राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या गटात 66 वा क्रमांक मिळवला आहे. यासोबतच महापालिकेला प्रथमच मैला सांडपाणी व्यवस्थापनामध्ये वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. हे सर्व्हेक्षण 12 हजार 500 गुणांचे होते. यामध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणा आणि हगणदारी मुक्त शहर व कचरा मुक्त शहर मानांकन होते. 12 हजार 500 गुणांपैकी 7 हजार 554 गुण कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे.
या सर्वेक्षणामध्ये घरोघरी कचरा संकलन, विलगीकरण, प्रक्रिया, तक्रारींचे निवरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, व्यावसायिक रहिवासी व मार्केट क्षेत्र स्वच्छता, जलस्रोत व सार्वजनिक शौचालय स्वच्छता, कोंडाळामुक्त रस्ते व ब्लॅक स्पॉट सुशोभीकरण आदींचा समावेश होता. तसेच हागणदारी मुक्त शहर मानांकनातील सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये एसटीपी व्यवस्थापन व शौचालय स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. यामध्ये घर ते घर कचरा संकलनासाठी ४८%, ओला व सुका कचरा विलगीकरणास ३५%, दैनंदिन घनकचरा प्रक्रियेसाठी ९७%, कचरा डेपो वरील प्रक्रियेसाठी ७१%, निवासी क्षेत्र स्वच्छतासाठी १००%, बाजार क्षेत्र स्वच्छतेसाठी १००%, सार्वजनिक शौचालय स्वच्छतेसाठी १०% असे विविध गटामध्ये महापालिकेस गुण मिळाले आहे.
या कामगिरीमध्ये प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. तर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील व सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, विकास भोसले व सर्व आरोग्य निरिक्षक, मुकादम व स्वच्छता कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न लाभले.