अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात ; भूमी चौहान ह्या थोडक्यात बचावल्या

Ahmedabad Plane Crash - अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया एआय -171 या विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातून गुजरातच्या भरूच येथील भूमी चौहान ह्या थोडक्यात बचावल्या. कारण, लंडनला जाण्यासाठी त्या विमान पकडण्यास फक्त 10 मिनिटे उशिरा आल्या होत्या. चेक - इन बंद झाल्याने सीआयएसएफ जवानांशी वाद घालूनही त्यांना विमानात चढण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्या निराश होऊन परत निघाल्या.
नंतर विमान कोसळल्याची बातमी समजताच त्या सुन्न झाल्या. एका मुलाखतीत भूमी म्हणाल्या, “माझी फ्लाइट 1:10 वाजता होती, पण मी 12:20 ला पोहोचले. चेक-इन 12:10 वाजता बंद झालं होतं. मी अनेक विनवण्या केल्या, पण सुरक्षेच्या कारणास्तव मला परवानगी नाकारण्यात आली.” त्यांना सांगण्यात आलं की, त्यांच्या उशिरामुळे विमानात उशीर होईल, त्यामुळे त्यांना घरी परत जावं लागलं. अहमदाबादमधील वाहतुकीमुळे उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं.
घरी जात असतानाच विमान कोसळल्याची बातमी त्यांनी ऐकली. त्या क्षणी देवाचे आभार मानले, पण अपघातात जीव गमावलेल्या सर्वांबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं.