संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असतानाच एक मोठी घडामोड घडली आहे. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्य आणि वैद्यकीय सेवेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला.
धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यांनी राष्ट्रपतींच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सौहार्दपूर्ण संबंधांची आठवण करून दिली.
राजीनाम्यात त्यांनी लिहिले आहे, “आपल्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेला अनुभव अमूल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य आणि पाठबळ याबद्दल मी विशेष आभारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून खूप काही शिकायला मिळाले.”
तसेच, संसदेतील सदस्यांकडून मिळालेला स्नेह, विश्वास आणि आदर कायम स्मरणात राहील, अशी भावना धनखड यांनी व्यक्त केली आहे.