तब्बल २३ वर्षांनी ३२ शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी उत्साहात साजरी

शिराळा - शेकडो वर्षांची परपंरा असणारा ३२ शिराळ्याचा जगप्रसिद्ध नागपंचमी सण केंद्र सरकारने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करून व जिवंत नागाची पूजा करून उत्साहात साजरा झाला. जिवंत नाग शैक्षणिक उद्देशासाठी व स्थानिक लोकांमध्ये, व समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण करण्यासाठी २१ नागरिकांना नाग पकडण्यास व प्रबोधनास परवानगी मिळाली आहे. त्याचे काटेकोर पालन केले गेले. गेली २३ वर्षे शिराळकरांनी यासाठी पाठपुरावा केला होता. आमदार सत्यजित देशमुख यांच्या सहित खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत यांचेही मोठे योगदान आहे. परंतु केंद्र व राज्य सरकारमुळे याला मूर्त रूप आले आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'अंबाबाईच्या नावानं चांगभलं' च्या गजरात आणि अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशा वातावरणात उत्साहात पार पडला.
पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. नागमंडळांचे कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग घेऊन मिरवणुकीने अंबामाता मंदिरात पोहोचले. प्रत्येक घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने मातीच्या नागाची, लाह्या, दुर्वा, कापसाचे वस्त्रासह पूजा केली.
प्रमोद महाजन तसेच रामचंद्र महाजन यांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी मानकरी कोतवाल, डवरी, भोई आदी मानकरी उपस्थित होते. यावेळी मानाचा नागराज मुखवटा आणि मानाचा सराफ यांनी दिलेल्या नाग प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नाग प्रतिमेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. कार्यकर्ते 'अंबाबाईच्या नावानं चांगभलं'च्या घोषणा देत होते. मिरवणुकीवेळी नागमंडळाच्या गाड्यांबरोबर पोलिस अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी यांचा फौजफाटा होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.
नागपंचमी साठी सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून होती.पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामध्ये १ पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक १०,सह्यायक पोलीस उपनिरीक्षक ३८,पोलीस कर्मचारी ३४२, महिला पोलीस अंमलदार ५०, वाहतूक पोलीस ४० यांची नियुक्ती करण्यात आली होती. कॅमेरामन ११ ध्वनी मापक यंत्र १९, ड्रोन कॅमेरे २, अंबामाता मंदिर परिसर ,मिरवणूक मार्गवर २० सिसिटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवर ४, व्हिडिओ कॅमेरे २०, एक बॉम्ब शोधक पथक , दोन दंगल विरोधी पथक, ४०वॉकी टॉकी सेट असा चोख बंदोबस्त होता.
वनखात्याने उपवनसंरक्षक सागर गवते व वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक १, विभागीय वन अधिकारी १, सहाय्यक वन संरक्षक ६, वनक्षेत्रपाल २०, वनपाल २०, वनरक्षक ३८, वनमजूर ५४, पोलिस कर्मचारी १०,दहा गस्ती पथकासाठी वनक्षेत्रपाल ४, वनरक्षक ४,वनमजूर ४, पोलिस कर्मचारी ४, फोटो ग्राफर ४, सर्पमित्र ४ ,तपासणी नाके ७,बत्तीस गल्ल्यासाठी सहा पथके, ड्रोन कॅमेरे, सी.सी.टी.व्ही कॅमेरे अशी तजवीज केली होती.तसेच सोशल मीडियावर तयार करण्यात येणाऱ्या गतीविधीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची नेमणूक करण्यात आली होती. एसटी बस ही सर्व मार्गावर जादा सोडण्यात आल्या होत्या.
प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.
नागपंचमी उत्सवास आमदार सत्यजित देशमुख, जनसुराज्य चे प्रदेशाध्यक्ष समित कदम , भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, शिवसेना नेते अॅड.भगतसिंग नाईक, पृथ्वीसिंग नाईक, विश्वप्रतापसिंग नाईक, माजी नगरसेवक केदार नलवडे, यांनी भेट दिली.