अशोक सराफ यांचा खुलासा : "सुरुवातीला सचिन माझा मित्र नव्हता..."

मुंबई - मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षं काम करताना कलाकारांमध्ये एक वेगळी नाळ जुळते, एक कुटुंब तयार होतं. या कुटुंबात काही नाती फक्त सहकलाकार म्हणून मर्यादित राहत नाहीत, तर ती खोल मैत्रीत रूपांतरित होतात. मराठी चित्रपटसृष्टीत अशीच एक जिव्हाळ्याची मैत्री म्हणजे अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांची. लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी उरलेली तिघांची मैत्री अजूनही तितकीच घट्ट आहे. नुकत्याच एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी या मैत्रीबद्दल खास सांगितलं. "करिअरच्या सुरुवातीला सचिन माझा मित्र नव्हता," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
अशोक सराफ पुढे म्हणाले, सचिनसोबत मी 'मायबाप' या सिनेमात पहिल्यांदा काम केलं. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. त्याने जे पंधरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केले, त्यात मी सगळ्यांमध्ये होतो. पण सुरुवातीला आमच्यात फारसं काही नातं नव्हतं. सचिनपेक्षा माझी त्याचे वडील शरद पिळगांवकर यांच्याशी जवळीक होती. ते निर्माता होते आणि त्यांच्या सिनेमांत मी काम केलं होतं. त्यामुळे शरदजींच्या ऑफिसमध्ये गेलो की, सचिन तिथं असायचा. तेव्हा आमचं बोलणं फक्त ‘कसाय? बराय ना?’ इतकंच असायचं. फारसं काही संवाद नव्हता.
पण नंतर एकत्र काम करताना दोघांमधली केवळ ओळख मैत्रीत बदलली. आम्ही एकत्र अनेक सिनेमे केले आणि बॅक-टू-बॅक हिट्स दिल्या. आमचं सुरेख जुळून आलं आणि आम्ही खरे मित्र झालो, असंही अशोक सराफ यांनी सांगितलं.
आजही सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची मैत्री अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नुकतेच हे दोघे "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटात एकत्र दिसले होते. या दिग्गज कलाकारांची केवळ ऑनस्क्रीन केमिस्ट्री नव्हे, तर ऑफस्क्रीन मैत्री देखील प्रेक्षकांच्या मनाला भावते.