रोहित शर्माच्या निवृत्तीवर जतिन परांजपे यांनी केला मोठा खुलासा

रोहित शर्माच्या निवृत्तीवर जतिन परांजपे यांनी केला मोठा खुलासा

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारताचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. रोहितचे एक मन हेलावून टाकणारे विधान समोर आले आहे. भारताचे माजी फलंदाज जतिन परांजपे यांनी एका पॉडकास्टवर रोहितविषयी एक महत्त्वाचा खुलासा केला. परांजपे म्हणाले, “कधीकाळी रोहित खूपच नाराज होता की लोक त्याच्या कसोटी क्रिकेटवरील निष्ठेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत. त्याला याचा फार त्रास व्हायचा. तो म्हणायचा, ‘जतिन, मी क्रिकेटच लाल चेंडूने खेळायला सुरुवात केली होती, मग लोक मला कसोटीमध्ये रस नाही असं कसं म्हणू शकतात?’”

परांजपेंनी सांगितले की, रोहितला या गोष्टीमुळे मनापासून वाईट वाटायचं. तो म्हणायचा, "मी लाल चेंडू खेळत मोठा झालो आहे, त्याच्यापासून मी कसा दूर जाऊ शकतो?" खरं तर रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील वाटचाल सुरुवातीला काहीशी कठीण होती. दुखापती आणि फॉर्मच्या चढ-उतारामुळे त्याला सातत्याने संघाबाहेर राहावे लागले. पण सहा वर्षांपूर्वी, जेव्हा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला सलामीवीर म्हणून संधी दिली, तेव्हापासून रोहितच्या कसोटी कारकिर्दीला नवा बहर मिळाला.

परांजपे पुढे म्हणाले, "रोहित म्हणायचा की तो कसोटी क्रिकेटसाठीच जगतो. मला वाटतं की त्याच्याकडून अजून खूप काही मिळू शकलं असतं. विशेषतः सिडनी कसोटीत त्याने स्वतःला वगळल्याचा निर्णय थोडासा निराशाजनक होता. कदाचित त्या सामन्यामुळे मालिका बरोबरीत संपुष्टात आली असती."