शाहरुख खानला ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत ; अमेरिकेत उपचार सुरू

शाहरुख खानला ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत ; अमेरिकेत उपचार सुरू

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या ‘किंग’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र अलीकडेच एका अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करताना त्याला स्नायूंची दुखापत झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगमधील दुखापतीनंतर शाहरुख अमेरिकेला उपचारासाठी रवाना झाला आहे. डॉक्टरांनी त्याला किमान एक महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

ही फार गंभीर दुखापत नसून सामान्य स्वरूपाची स्नायूंची इजा असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचार पूर्ण होईपर्यंत ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले असून, ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

शाहरुख खानला यापूर्वीही अनेक वेळा चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दुखापतींचा सामना करावा लागला आहे. ‘डर’ (1993) चित्रपटाच्या चित्रीकरणात त्याला अपघात झाला होता, तर ‘कोयला’ च्या सेटवरही त्याला दुखापत झाली होती. ‘शक्ती’ चित्रपटातील 'इश्क कमिना' आयटम साँग दरम्यान त्याच्या पाठीला गंभीर इजा झाली होती आणि त्यासाठी यूकेमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात अ‍ॅक्शन सीनच्या वेळी त्याच्या डाव्या खांद्यालाही दुखापत झाली होती.

‘किंग’ चित्रपटाबद्दल माहिती - 

‘किंग’ हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे आणि तो २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर आणि सुहाना खान यांची प्रमुख भूमिका आहे. यापूर्वी शाहरुख 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या यशस्वी चित्रपटांमध्ये झळकला होता.