‘गोकुळ’ला सहकार्य करण्यास एन.डी.डी.बी.कटिबद्ध - डॉ.मिनेश शहा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांनी दि. ३० जुलै २०२५ रोजी आनंद (गुजरात) येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, एन.डी.डी.बी. (आणंद) च्या प्रकल्पांना व खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, आणंद (अमूल) संघाच्या परिसरातील प्रगत प्राथमिक दुग्ध संस्थांना अभ्यासपूर्वक भेट दिली. यावेळी डॉ. मिनेश शहा म्हणाले की, ‘गोकुळ’ला सहकार्य करण्यास एन.डी.डी.बी.कटिबद्ध आहोत.
यावेळी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड चे चेअरमन डॉ. मिनेश शहा व गोकुळ दूध संघाचे संचालक यांची बैठक एन.डी.डी.बी.च्या कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना डॉ.मिनेश शहा पुढे म्हणाले कि, गोकुळ दूध संघ हा देशातील एक सकारात्मक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आदर्श सहकारी दूध संघ आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी गोकुळने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असून इतर संघांसाठी प्रेरणादायी आहे. एन.डी.डी.बी. कडून गोकुळला आवश्यक ते सहकार्य मिळाले असून भविष्यात हे सहकार्य अधिक व्यापक व प्रभावी स्वरूपात दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विशेषतः वासरू संगोपन योजना, आय.व्ही.एफ. आणि चार वीट प्रकल्प (टी.एम.आर.) या क्षेत्रात गोकुळने दाखवलेला पुढाकार व अंमलबजावणीचे काम अत्यंत प्रशंसनीय आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. भविष्यात एन.डी.डी.बी. आणि गोकुळ यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होईल व संयुक्तपणे अनेक प्रगत उपक्रम राबवले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत गोकुळच्या चालू उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यातील विविध दुग्ध व्यवसायाच्या वाढीच्या संधींवर सखोल चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास, दूध उत्पादन क्षमता वाढविणे व नव्या धोरणात्मक उपक्रमांची अंमलबजावणी यांचा समावेश होता.
यावेळी गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, एन.डी.डी.बी. च्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या योजनांचा तसेच नवीन प्रकल्पांचा अभ्यास हा गोकुळसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आम्ही येथे पाहिलेल्या कामाकाजाची पद्धत, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या सगळ्याचा उपयोग करून गोकुळ संघाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल करू. गोकुळ संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दूध उत्पादकांना अधिक सक्षम बनविण्यासाठी गोकुळ कटिबद्ध आहे.
या अभ्यास दौऱ्याअंतर्गत एन.डी.डी.बी. मुख्यालय, आणंद (गुजरात) तसेच मूजकुवा गावातील जैविक खत प्रकल्प, सौर ऊर्जा आधारित सिंचन सहकारी संस्था आणि दुग्ध संस्था, एन.डी.डी.बी.च्या वासरू संगोपन प्रकल्प, जनोमिक्स प्रयोगशाळा, कृत्रिम गर्भधारणा केंद्र (IVF), चारा विकास केंद्र, (टी.एम.आर.) तसेच भारतातील प्रगत डेअरी यंत्रसामग्री उत्पादक कंपनी (IDMC) ला भेट देऊन विविध विषयांची सविस्तर माहिती घेतली तसेच खेडा जिल्हा दूध संघाच्या प्राथमिक दूध संस्था बेडवा येथे भेट देत संस्थेचे दूध उत्पादक, प्रक्रिया केंद्र, दूध संकलन व्यवस्थापन आणि संस्थेच्या कामकाजाचा अभ्यास केला.
याप्रसंगी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एन.डी.डी.बी.) चे चेअरमन मिनेश शहा, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच अमूल फेडरेशन कार्यकारी संचालक डॉ.अमित व्यास,एन.डी.डी.बी चे डॉ.श्रीधर, डॉ. श्रीनिवास, डॉ. राजेश, डॉ. शेटकर, मनोज मुदडा, नितीन ठाकरे व अधिकारी उपस्थित होते.