२० वर्षांपासून लक्झरी कार चोरणारा एमबीए पदवीधर चोरटा जेरबंद

चेन्नई - राजस्थानातील सतेंद्र सिंग शेखावत या अट्टल चोरट्याला चेन्नई पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गेली २० वर्षे तो देशभरातल्या विविध राज्यांमधून महागड्या कार चोरून, त्या राजस्थान आणि नेपाळमध्ये विकत होता. आतापर्यंत त्याने १०० पेक्षा जास्त लक्झरी गाड्या चोरल्या असून या व्यवसायातून कोट्यवधींचा नफा मिळवला आहे. विशेष म्हणजे सतेंद्र एमबीए पदवीधर असून त्याचे वडील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आहेत.
चेन्नईतील अण्णा नगर परिसरातील रहिवासी एथिराज रथिनम यांच्या आलिशान कारची चोरी झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. एथिराज रथिनम यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता चोरटा पुद्दुचेरीत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांनी सापळा रचून सतेंद्रला अटक केली आणि पुढील चौकशीसाठी चेन्नईला आणले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतेंद्र अत्याधुनिक साधनांचा वापर करून गाड्यांचे लॉक उघडत असे. एकदा गाडी मिळाल्यानंतर तो तिला थेट रस्त्याने राजस्थान किंवा नेपाळला घेऊन जात असे. तिथे तो या गाड्या विकून मोठी रक्कम मिळवत होता. चोरी करताना तो अतिशय शांतपणे आणि नीट नियोजन करून काम करत असे, त्यामुळे गेली दोन दशके तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला नव्हता.
सतेंद्रला अटक झाल्यानंतर, १० हून अधिक गाड्या चोरीला गेलेल्या व्यक्ती थेट तिरुमंगलम पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांच्या तक्रारींचा तपास करत असताना पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सतेंद्र सिंग शेखावतला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. चेन्नई पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि आणखी चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.