भूस्खलनात अडकलेली असताना तब्बल पाच तास मृत्यूशी झुंज देत तिने...

कुल्लू : हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. काही भागांत भूस्खलन झालं असताना मंडीमध्ये 20 वर्षांची ट्यूनेजा ठाकूर नावाची तरूणी भूस्खलनात माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. तब्बल पाच तास मृत्यूशी झुंज देत तिने स्वतः ला वाचवलं. तिच्या जीवघेण्या संघर्षाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
ट्यूनेजा ढिगाऱ्याखाली दबली असताना तिला दम लागायला लागला. पण तिने हार मानली नाही. ती सतत हातांनी माती बाजूला करत राहिली, श्वास घेण्याइतकी जागा मिळवली आणि स्वतः ला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत राहिली. दरम्यान, तिचे कुटुंबीय आणि गावकरी तिचा शोध घेत होते.
ट्यूनेजा सांगते, माझ्या डोळ्यांसमोर लोकांची धावपळ, किंचाळ्या, पावसाचं जोरदार रौद्र रूप दिसत होतं. मी सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात अचानक भूस्खलन झालं आणि मी त्याखाली अडकलं. मला फक्त हेच माहित होतं की, मला जिवंत राहायचं आहे.
शेवटी, पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिच्या पालकांनी तिला ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. तिच्या धैर्याचं आणि जिद्दीचं कौतुक सर्वत्र केलं जात आहे. या घटनेनंतर हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर यांनी ट्यूनेजाची भेट घेऊन तिच्या शौर्याचं विशेष कौतुक केलं.