कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

भोपाळ : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या चर्चेत आल्या असतानाच मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी त्यांच्या संदर्भात केलेल्या विवादास्पद वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या शब्दांचा रोख दहशतवाद्यांवर होता, मात्र त्यांनी वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह ठरल्याने विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. 'पंतप्रधान मोदींनी त्यांच्या (दहशतवाद्यांच्या) बहिणीला लष्कराच्या विमानातून हल्ला करण्यासाठी पाठवून प्रत्युत्तर दिले,' असे म्हणाले, ज्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. यावरुन विरोधकांनी शाहांना घेरले.

मंत्री विजय शाह यांनी एका मेळावादरम्यान म्हटले की, 'त्यांनी (दहशतवाद्यांनी) आमच्या हिंदू बांधवांना कपडे काढायला लावले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या (दहशतवाद्यांच्या) बहिणीला लष्कराच्या विमानातून त्यांच्या घरांवर हल्ला करण्यासाठी पाठवून प्रत्युत्तर दिले. त्यांनी (दहशतवाद्यांनी) आमच्या बहिणींना विधवा केले, म्हणून मोदीजींनी त्यांच्या समुदायातील बहिणींना त्यांचे कपडे काढण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पाठवले.' त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकास्त्र डागले जात आहे.

वाद वाढत असल्याचे समजताच शाह यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, जर माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असेल तर मी दहा वेळा माफी मागण्यास तयार आहे, मी माझ्या बहिणीपेक्षा कर्नल कुरेशी यांचा जास्त आदर करतो.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात 'अपमानास्पद' टिप्पणी करणाऱ्या शाह यांना तात्काळ पदावरून काढून टाकावे.

काय म्हणाले खर्गे ?

एक्स हँडलवर पोस्ट लिहित खर्गे म्हणाले, 'मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या एका मंत्र्याने आमच्या शूर कन्या कर्नल सोफिया कुरेशीबद्दल अतिशय अपमानास्पद, लज्जास्पद आणि खालच्या दर्जाचे विधान केले आहे. पहलगामचे दहशतवादी देशाचे विभाजन करू इच्छित होते, परंतु दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्यासाठी संपूर्ण 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान देश एकजूट होता.' तर मध्यप्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनीही शाहांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मंत्र्यांच्या 'नीच विचारसरणी'शी भाजप सहमत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.