पुण्याच्या व्यापाऱ्यांची तुर्कीविरोधात आक्रमक भूमिका; सफरचंदावर टाकला बहिष्कार

माझा महाराष्ट्र ऑनलाईन: पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या अमानवी कृत्याचा बदला घेण्यासाठी भारताने "ऑपरेशन सिंदूर" राबवत पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. मात्र पाकिस्तानने उलट भारतावरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. भारताने हे सर्व हल्ले चोख प्रत्युत्तर देत परतवून लावत पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरूवात केली.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बहुतांश देशांनी दहशतवादाचा निषेध करत भारताला पाठिंबा दिला. परंतु काही देशांनी, विशेषतः तुर्कीने, पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत अघोषित कुरघोडी केली. त्याचा तीव्र संताप भारतात उमटला असून आता व्यापाऱ्यांनी तुर्कीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘बॅन तुर्की’ मोहिमेअंतर्गत तुर्की सफरचंदांवर बहिष्कार
तुर्कीने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिल्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांनी 'बॅन तुर्की' मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंदांवर थेट बहिष्कार टाकण्यात आला आहे. परिणामी, तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाले असून ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी त्याऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंड येथील सफरचंदांना पसंती दिली आहे.
मार्केट यार्डातील सफरचंदाचे आडतदार सत्यजित झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधून येणाऱ्या सफरचंदांच्या दरात प्रति पेटी 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.