शाहू कारखाना कार्यस्थळावर राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी अभिवादन

कागल (प्रतिनिधी) - कागल येथे शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर श्री. छत्रपती शाहू उद्योग समूहाचे संस्थापक राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना ७७ व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी अभिवादन केले. कारखाना प्रांगणातील घाटगे यांच्या पुतळ्यास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कारखाना प्रांगणातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व प्रधान कार्यालयातील कागल अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण केला.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कारखाना गेस्ट हाऊस परिसरात वृक्षारोपणही केले. शाहू ग्रुप अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धाही उत्साहात संपन्न झाल्या.
दरम्यान कारखाना कार्यस्थळी स्व. घाटगे यांना अभिवादन करण्यासाठीआज दिवसभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक व शेतकऱ्यांनी दिवसभर रीघ लावली होती.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक, संचालिका, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, शिवानंद माळी, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.