कागलच्या उज्वल भविष्यासाठी राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे - राजे समरजितसिंह घाटगे

कागलच्या उज्वल भविष्यासाठी राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे - राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) - कागलच्या उज्वल भविष्यासाठी मतभेदामुळे बाजूला गेलेल्या राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात एकत्र यावे,असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक व माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाचे वंदूर (ता.कागल) येथील प्रमुख कार्यकर्ते शिवसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या स्वागतवेळी घाटगे बोलत होते. 

घाटगे पुढे म्हणाले, प्रवेश केलेले सर्वजण हे मूळचे स्वर्गीय विक्रमसिंहराजे यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते स्वगृही परत आले आहेत.त्यांचा योग्य तो मानसन्मान राखू. कार्यकर्त्यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमध्ये गुंतून न राहता आगामी निवडणुका जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागावे.

बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील म्हणाले,अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांमध्ये कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. कागल तालुक्यात मात्र सत्तेत नसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. ही कागलच्या बदलत्या राजकारणाची नांदी आहे.

'अन्नपूर्णा'चे संचालक शिवसिंह घाटगे म्हणाले, एकेकाळी आमच्या घराण्यासह संपूर्ण गावाने स्वर्गीय राजेसाहेब यांच्या पाठीशी राहून साथ दिली.आता समरजीतराजे वयाने लहान असूनही मोठ्या शक्तींच्या विरोधात लढत आहेत. त्यांच्या या लढाईत आम्ही ताकतीने प्रामाणिकपणे साथ देऊ.

यावेळी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, कारखान्याचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, संजय कदम, संभाजी फराकटे आदी उपस्थित होते.

'शाहू' चे संचालक प्रा. सुनील मगदूम यांनी स्वागत केले. राजे बँकेचे संचालक एम.पी. पाटील यांनी आभार मानले.

 गतवैभव परत मिळवूया..

विक्रमसिंहराजे घाटगे यांचे एकेकाळी केवळ कागल तालुकाच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व होते.कागल तालुक्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचे त्यांचे स्वप्न होते.मध्यंतरीच्या बाजूला गेलेले कार्यकर्ते स्वगृही परत आले आहेत.आता झाले गेले विसरून उर्वरीत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गतवैभव परत मिळवूया असेही यावेळी घाटगे म्हणाले.