धनंजय मुंडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकली ; करुणा शर्मा यांची न्यायालयात निवडणूक याचिका दाखल

धनंजय मुंडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकली ; करुणा शर्मा यांची न्यायालयात निवडणूक याचिका दाखल

छत्रपती संभाजीनगर : केज तालुक्यामधील सरपंच संतोष देशमुख यांचे  हत्या प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण आक्रमकपणे लावून धरलं आहे. सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. विरोधकांसह सत्ताधारीही मुंडेंबाबत आक्रमक झाले आहेत. राज्यभर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे निघत असल्याने आता मुंडेंचं मत्रिपदही धोक्यात आलं आहे. अशातच करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा शर्मा-मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. धनंजय मुंडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निवडणूक याचिकेचा स्टॅम्प क्रमांक ५०९/२०२५ आहे, अशी माहिती ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे.

  

पत्नीच्या नावावरील मालमत्ता, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली 

आपण स्वतः १९९६ साली कायदेशीर लग्न झालेली पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्र ताब्यात घेतले. मतदान केंद्रांवर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावू दिले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान केंद्रावर प्रवेश करू दिला नाही. त्यांना मारहाण करून धमक्या दिल्या. तसेच ॲड. माधव जाधव यांना मारहाण केली. मुंडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकली, असे आरोप याचिकेत केले आहेत. करुणा शर्मा यांच्या वतीने ॲड. चंद्रकांत ठोंबरे काम पाहत आहेत. ॲड. ज्योती सदावर्ते यांनी सहकार्य केले.