दिल्ली हायअलर्ट मोडवर

दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशातील सध्याच्या घडामोडींमुळे भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य धोके ओळखून दिल्ली NCR परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
दिल्ली पोलीस आयुक्तांनी स्पेशल सेल, क्राईम ब्रान्च, आणि जिल्हा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. विशेषतः दिल्लीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची स्वतंत्र यादी बनवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.