पंचगंगेने धोकापातळी ओलांडण्याआधी स्थलांतर करा : पालकमंत्री
रोहन भिऊंगडे / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी :
पंचगंगेने धोकापातळी ओलांडण्याआधी स्थलांतर करावे असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांना केले. केसरकर यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली, इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ, आंबेवाडी, प्रयाग चिखली भागातील पूरबाधित भागाचा दौरा केला. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर, जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 90 टक्के, कासारी व कुंभी धरण 80 टक्के भरले आहे. सद्या पंचगंगेत 60 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. जर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला तर पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली, इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ, आंबेवाडी, प्रयाग चिखली भागातील पूरबाधित क्षेत्राचा व संभाव्य पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रशासनाने सुरु केलेल्या निवारागृह, जनावरांसाठीची सोय तसेच नदीची पाणीपातळी याबाबत पाहणी केली. यावेळी उपस्थित गावातील नागरिक, प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेवून गरजूंना तातडीने मदत करण्यासाठी सूचना केल्या. या भेटीवेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच शिरोळ येथील भेटीवेळी आमदार तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजित म्हेत्रे उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले, पावसाचा जोर सद्या जरी कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास किमान 12 तास आधी लोकांना स्थलांतरीत करावे लागेल. आंबेवाडी व प्रयाग चिखली येथे नागरिकांनी पूरस्थितीबाबत व कायमस्वरूपी स्थलांतरणाबाबत पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली. यावर त्यांनी शासनाची पॉलिसी बदलण्यासाठी काय करता येईल याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करु तसेच या प्रश्नाबाबत अधिवेशन कालावधीनंतर बैठक लावू, असे आश्वासन दिले.
संभाव्य पूरबाधित क्षेत्राचा दौरा करताना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जीवित हानी न होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. चांगल्या निवाऱ्यासह नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी पुरवा, जनावरांसाठी निवारा तसेच पुरक चारा द्या. आरोग्य व पशुसंवर्धन विभागाने युध्द पातळीवर काम करुन लोकांची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केलेल्या तयारीबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील घेतला तयारीबाबत आढावा
जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, माजी आमदार चंद्रदीप नरके तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांच्या वाढणाऱ्या पाणी पातळीचा अंदाज घेऊन नागरिकांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. ते म्हणाले, अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत जिल्हाधिकारी समन्वय साधत आहेत. तथापि, जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्गाबाबत जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे. तसेच विसर्ग होण्यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करा. अतिवृष्टीमुळे नद्यांची वाढणारी पाणीपातळी व धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता येत्या दोन दिवसात धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आयत्या वेळी बोटीतून स्थलांतर करताना नागरिक व जनावरांच्या जीवाला धोका पोहोचू नये याची दक्षता घ्या. पुराच्या पाण्यात नागरिक अडकणार नाहीत, याची खबरदारी घ्या. स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा वेळेत द्या. पिण्याचे पाणी, औषध पुरवठा, जनावरांसाठी पुरेसा चारा द्या. पुर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याबरोबरच साफसफाई व अन्य कामे तातडीने करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूर परिस्थिती व प्रशासनाचे नियोजन याबाबत माहिती दिली.