रवींद्र जडेजाचा नवा विश्वविक्रम, कोणत्याच खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

रवींद्र जडेजाचा नवा विश्वविक्रम, कोणत्याच खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

मुंबई : एकीकडे विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केले असताना, दुसरीकडे भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटीत विक्रमी प्रदर्शन करत आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजाने पुन्हा एकदा पहिलं स्थान पटकावलं आहे. 

जडेजा सध्या 400 रेटिंग गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे, तो सलग 1152 दिवसांपासून (38 महिने) या स्थानावर कायम आहे. 9 मार्च 2022 रोजी त्याने वेस्ट इंडिजचा जेसन होल्डरला मागे टाकून हे स्थान मिळवले होते. याआधीही, 2017 मध्ये तो एक आठवड्याकरता नंबर वन राहिला होता.

अलीकडील रँकिंगमध्ये बांगलादेशचा मेहदी हसन मिराज दुसऱ्या क्रमांकावर (327 गुण) आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅन्सन तिसऱ्या स्थानावर (294 गुण) पोहोचला आहे. पॅट कमिन्स चौथ्या, आणि शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर आहेत.

जडेजा वगळता टॉप 10 मध्ये भारताचा कोणताही अष्टपैलू नाही, तर अक्षर पटेल 12 व्या स्थानावर आहे. जडेजाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने भारताला कसोटीत स्थिरता दिली असून, त्याचा हा विक्रम भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद आहे.