'कोजिमाशि' पतसंस्थेस ४ कोटी ८७ लाख नफा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : "माध्यमिक शिक्षकांची शिखरसंस्था असलेल्या कोजिमाशि पतसंस्थेस ४ कोटी ८७ लाख रुपये नफा झाला असून, मार्चअखेर संस्थेने ६०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला. या आर्थिक वर्षात उच्चांकी लाभांश दिला जाणार आहे," अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील व तज्ज्ञ संचालक दादा लाड यांनी दिली.
ते म्हणाले, "वाढती कर्ज मागणी व ठेवीचा तेवढाच ओघ हे सभासद व ठेवीदार यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ३१ मार्च २०२४ अखेरीस संस्थेने ४८४ कोटी १३ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक २२८ कोटी २ लाख, निधी ४४ कोटी ३२ लाख, शेअर्स २८ कोटी ४३ लाख तसेच मयत सभासदांची कर्जमाफी १४ कोटी ६ लाख रुपयांची करण्यात आली आहे. एकूण कर्ज मर्यादा ४२ लाख असून सभासद कर्ज
१० टक्के दराने आहे. १ जुलै २०२४ पासून नऊ टक्के व्याजदराने तातडीचे २ लाख रुपये कर्ज वाटप सुरू केले आहे. दरवर्षी सभासदांच्या पाल्यांचा सत्कार कन्यादान साडीसाठी व कन्याजन्म स्वागतासाठी संस्थेमार्फत धनादेश व ठेवपावती तसेच सभासद कल्याण निधीतून वैद्यकीय कारणासाठी सभासदांना आर्थिक मदत केली जाते.
संस्थेकडे प्रधान कार्यालयासह अकरा शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. सर्व शाखांमध्ये संगणकीकृत, सीसीटीव्ही कक्षेत व एसएमएस सुविधा आहेत. संस्थेमध्ये लवकरच कोअर बँकिंग सेवा सुरू होत आहे. संस्था सुवर्णमहोत्सव प्रसंगी सभासदांना प्रवासी बॅग व शाळांता वॉलक्लॉक भेट दिलेली आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, सीईओ जयवंत कुरडे व संचालक उपस्थित होते.