विक्रमसिंहराजेंच्या नियोजनास कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक साथीमुळे 'शाहू' चा देशात नावलौकिक - राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) - शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नियोजनाला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रामाणिक साथीमुळे शाहू साखर कारखाना देशात अग्रेसर राहून कारखान्याचा देश पातळीवर नावलौकिक झाला असल्याचे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
कारखाना कार्यस्थळावर स्व.घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहकुटूंब सत्कारवेळी ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षभरात कारखाना सेवेतून निवृत्त झालेल्या अठरा कर्मचाऱ्यांचा अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सहकुटूंब सत्कार केला.
घाटगे पुढे म्हणाले, कर्मचारी जरी कारखाना सेवेतून निवृत्त झाले असले तरी स्व. विक्रमसिंहराजेंपासून शाहू ग्रुपशी त्यांचे असलेले ऋणानुबंध व नाते अतूट राहील. स्व. विक्रमसिंहराजे हे कल्पक दृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कल्पकतेमुळे कारखान्यासह शेतकरी कर्मचारी यांचे जीवन समृद्ध झाले.
स्वागत एच.आर .मॅनेजर बाजीराव पाटील यांनी केले. शाहू साखर कामगार संघाचे उपाध्यक्ष शशिकांत धनवडे यांनी आभार मानले.
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक,संचालिका,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.