गारगोटी ते तुरंबे मोटर सायकल रॅलीत 10 हजार हून अधिक युवकांचा सहभाग
गारगोटी (प्रतिनिधी) : आमदार प्रकाश आबिटकर हे युवकांचे आयडॉल असल्यामुळे त्यांच्या विजयासाठी युवक उत्फुर्तपणे प्रचारात उतरले असून गारगोटी ते तुरंबे अशी जबरदस्त मोटर सायकल रॅली काढून विजयाची पताका खांद्यावर घेतली आहे. भुदरगड तालुक्यातील तब्बल 10 हजारहून अधिक युवक उत्फुर्तपणे मोटर सायकल रॅलीत सहभागी झाल्यामुळे युवक मोटर सायकल रॅली चर्चेचा विषय बनली आहे.
आमदार प्रकाश आबिटकर हे सहजपणे युवकांत मिसळतात त्यांची विचारपूस करतात. प्रसंगी मदतीलाही धावून जातात. त्यांचा पेहरावही युवकांसारखाच, त्यांचे विचारही युवकांना प्रोत्साहीत करणारे असल्यामुळे नेहमीच त्यांच्या भोवती युवकांचा मोठा गराडा असतो. त्यामुळे त्यांचे नेतृत्व युवकांना भावते. आमदार आबिटकर हे तिसऱ्यांदा विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. युवकांचा बुलंद आवाज पुन्हा एकदा विधानसभेत गेला तरच युवक आणि मतदार संघाचा विकास होईल अशी भावना युवकांच्या मनात तयार झाल्यामुळे मतदार संघातील युवक आमदार आबिटकर यांच्या विजयासाठी अहोरात्र झटत आहेत. याची प्रचिती प्रचार शुभारंभ मोटर सायकल रॅलीच्या दरम्याने बुधवारी दिसून आली.
भुदरगड तालुक्यातील गावा-गावातील युवक गारगोटी शहरातील जोतीबा चौकात सकाळ पासून जमा होत होते. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात स्कार्प, खिशावर धनुष्यबाण आणि मोटर सायकलवर आमदार आबिटकर यांची छबी असलेला झेंडा तसेच भाजपा, राष्ट्रवादी व आरपीआय यासह मित्रपक्षांचे युवक प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे जोतीबा चौकातील वातावरण भगवे होऊन गेले होते. सकाळी 10 च्या सुमारास रॅलीला सुरवात झाली. रॅलीतील युवक बेभान उत्साहात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते.
प्रचार रॅली गारगोटी शहरातून मुख्य मार्गावरून खानापूर, कलनाकवाडी, मडिलगे, कूर, मुदाळ, बिद्री, कासरवाडा, तुरंबे अशी झाली. रॅली जस-जशी पुढे मार्गस्थ होईल तस-तशे युवकांचे जथ्थेच्या रॅलीत सहभागी होत होते. यामुळे रस्ता गर्दीने फुलून गेलेला होता. या प्रचार रॅलीने आत्तापर्यंतच्या सर्व प्रचार रॅलींचे विक्रम मोडीत काढले.