क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात घुसलेल्या सापाने उडवली खळबळ

श्रीलंका - श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने 77 धावांनी जिंकत विजयी सुरुवात केली. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. श्रीलंकेचा कर्णधार चरिथ अस्लंका याने दमदार शतक ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र, सामन्यादरम्यान अचानक साप घुसला असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
श्रीलंकेची शतकी खेळी, अस्लंकाचे नेतृत्वदायी प्रदर्शन -
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवात काहीशी संथ झाली, पण कुसल मेंडिसने 45 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्णधार चरिथ अस्लंका याने आक्रमक फलंदाजी करत 106 धावांचे शानदार शतक झळकावले. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. यजमानांनी निर्धारित 50 षटकांत 244 धावा उभारल्या.
मैदानात सापाची एन्ट्री -
बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या षटकात एक साप थेट मैदानात घुसला. तो खेळपट्टीकडे झपाट्याने सरकत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे सामना काही वेळ थांबवावा लागला. श्रीलंकेत यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, काही दिवसांपूर्वीच्या सामन्यात देखील साप मैदानात आल्याची नोंद आहे.
बांगलादेशचा डाव ढासळला -
245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने सुरुवातीला चांगली गती पकडली होती. तन्जीद हसनने 62 आणि नझमुल हुसेन शांतोने 23 धावा करत संघाला 100 धावांपर्यंत फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात नेले. मात्र, नझमुल धावबाद झाल्यानंतर संघाची घसरण सुरू झाली. पाहता पाहता बांगलादेशचा डाव 125/9 पर्यंत कोसळला.
शेवटी, अलीने 51 धावांची लढवय्यी खेळी केली, पण ती अपुरीच ठरली. संपूर्ण संघ 35.5 षटकांत फक्त 167 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना 77 धावांनी जिंकला.
पुढील सामने -
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 5 जुलै रोजी, तर तिसरा आणि शेवटचा सामना 8 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेकडे आता मालिकेत 1 - 0 अशी आघाडी आहे.