गोळीबार प्रकरणात आमदाराच्या भावाला अटक ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ

पुणे - दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाला अटक केली आहे. ही घटना वाखारी येथील अंबिका कला केंद्रात 21 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव बाळासाहेब मांडेकर असून, ते भोर - वेल्हा - मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचे सख्खे बंधू आहेत. शंकर मांडेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे या प्रकारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.
नेमकं काय घडलं?
गोळीबाराची माहिती पहिल्यांदा समाजमाध्यमांतून पसरली. मात्र, कोणतीही अधिकृत तक्रार पुढे आली नव्हती. कला केंद्राचा मालकदेखील गोळीबार झाला नसल्याचं सांगत होता. पोलिसांनी चौकशी वाढवली असता, केंद्राचा मॅनेजर पुढे येऊन गोळीबार झाल्याचं कबूल केलं. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब मांडेकर यांनी नाचताना अचानक पिस्तूल काढून हवेत गोळी झाडली. गोळी भिंतीवर व छतावर आदळली. या धक्क्यामुळे एक नर्तकी बेशुद्ध पडली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शंकर मांडेकर कोण?
शंकर मांडेकर यांची राजकीय कारकीर्द विविध पक्षांतून झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केली, नंतर शिवसेनेत प्रवेश केला. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी निवडणुकीत संग्राम थोपटे यांच्यासारख्या मजबूत उमेदवाराचा पराभव करून "जायंट किलर" अशी ओळख निर्माण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर नवा पेच -
या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नवा राजकीय पेच उभा राहिला आहे. याआधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यामुळेही पक्ष अडचणीत आला होता. आता आमदाराच्या भावाच्या गैरकृत्यामुळे पक्षाची प्रतिमा पुन्हा एकदा संकटात आली आहे.