अभिनेत्री प्रियांका चोप्रा 'या' चित्रपटातून करणार बॉलीवूडमध्ये कमबॅक

मुंबई - एकीकडे फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सध्या तात्पुरता स्थगित झाल्याचं बोललं जात असताना, दुसरीकडे अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे. तिनं थेट एस. एस. राजामौली यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय आता ती ‘क्रिश ४’ मध्येही दिसणार असल्याच्या चर्चा मनोरंजन विश्वात रंगत आहेत.
हृतिक रोशनच्या सुपरहिरो फ्रँचायझी ‘क्रिश’ चा चौथा भाग सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. ‘कोई मिल गया’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘क्रिश ४’ पर्यंत पोहोचला असून, यंदा हृतिक अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळणार आहे. विशेष म्हणजे, रेखा आणि प्रीती झिंटा या अभिनेत्रीही या भागासाठी पुन्हा एकत्र येणार असल्याचं समजतं. आता त्यात प्रियांकाचं नावही जोडल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजून एका नव्या अभिनेत्रीची निवड प्रक्रियाही सुरू आहे. मात्र तिचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. प्रियांकानं याआधी ‘क्रिश’ (2006) मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. तब्बल १९ वर्षांनंतर ती पुन्हा या फ्रँचायझीत झळकणार आहे. चौथा भाग ‘क्रिश ३’ नंतर तब्बल १५ वर्षांनी येतोय, त्यामुळे कथानकातही दशकभराचा मोठा कालावधी पुढं नेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "क्रिश आणि हृतिक यांचं समीकरण पुन्हा जमलं आहे. हृतिक आता नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून या पात्राला पाहू शकतो. फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी हा योग्य काळ आहे."
दरम्यान, एस. एस. राजामौली यांच्या SSMB29 या प्रोजेक्टसाठी प्रियांकाने महेश बाबूसोबत हैदराबादमध्ये चित्रीकरण पूर्ण केल्याचं वृत्त आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तिनं या चित्रपटासाठी जवळपास ३० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्यामुळे ती सध्या दीपिका पदुकोणलाही मागे टाकत सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री ठरत आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
प्रियांकानं आपल्या मुली मालतीच्या जन्मानंतर काही काळ प्रोजेक्ट्सपासून दूर राहणं पसंत केलं होतं. आता मात्र तिनं पुन्हा करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतं.