डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीरित्या संपन्न झाला. कोल्हापूर, बेळगाव, सांगली कराड, बार्शी व सोलापूर येथून सुमारे २२८ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती यामधून साधारण 60 हून अधिक विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड झाली.
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आपल्या फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच एक सामाजिक जाणीव म्हणून अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुध्दा नोकरीची संधी निर्माण करून देण्यासाठी कोल्हापूर येथे सलग दुसऱ्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हसाठी गोवा मधून ब्लू क्रॉस, मुंबईमधून वेलनेस फॉरेवर, जेनेरीकार्ट, सिरॉन, पुणे येथून एम बी केमिकल्स व निवान लॅब्स या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी औषधनिर्माण शाखेतील विविध पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठी उपस्थित होते. फार्मसीबरोबरच इंजीनियरिंग व इतर सायन्स पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी यावेळी संधी उपलब्ध झाल्या.
सदर मेघा पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार विविध परीक्षा घेण्यात आल्या, एप्टीट्यूड टेस्ट व ग्रुप डिस्कशनचा समावेश होता. यातून उत्तम गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हे अंतिम म्हणजे पर्सनल इंटरव्यू या राऊंडला सामोरे गेले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी द्वितीय वर्ष) च्या 10विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता व त्यापैकी 4 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, हा उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम करिअर संधी प्रदान करण्याची आमच्या वचनबद्धता अधोरेखित करते. यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाखती आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या निमित्ताने मिळाली आहे. विद्यार्थ्याना उत्तम करिअर संधी मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील.
सिरी एज्युटेकचे सचिन कुंभोजे म्हणाले की, मेगा पूल कॅम्पस ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे व तसेच सिरी एज्युटेक तर्फे सचिन कुंभोजे, अंजोरी कुंभोजे आणि अमेय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.