'ते' तर फडणवीसांना बंद दाराआड भेटतात ; शरद पवार गटाने घेतला राऊत यांचा समाचार

'ते' तर फडणवीसांना बंद दाराआड भेटतात ; शरद पवार गटाने घेतला राऊत यांचा समाचार

पुणे : आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे एका महिन्यात तीन-तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, तेव्हा शरद पवार काही बोलतात का? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. 

काय म्हणाले होते संजय राऊत ?

राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्यासोबत शरद पवार खुलेआम बसलेले आहेत. त्यांना अशा प्रकारे सन्मान आपल्या हातून देणं, महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारं आहे, ही आमची भावना आहे, कदाचित शरद पवारांची भावना काही वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे राजकारण पटलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.

शरद पवार गटाने दिले प्रत्युत्तर 

काल दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दिल्लीत होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला राज्याचे आणि देशाचे लोकनेते म्हणून शरद पवार यांना निमंत्रण असतं. शरद पवार नेहमी जात धर्म पक्ष न पाहता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याचं काम करतात. असं असताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही अत्यंत हस्यास्पद आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले.

मागचे पंचवीस वर्ष संजय राऊत हे राज्यसभेवर खासदार असताना त्यांना राजकारणाची व्यापक दृष्टी नसेल तर हा त्यांचा पोरखेळ आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे एका महिन्यात तीन तीन वेळेस देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, बंद दाराआड चर्चा देखील होते, त्यावेळेस काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्षेप किंवा शंका घेत नाही. पण संजय राऊत यांची टीका ही महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकणारी आहे. संजय राऊत आपण 25 वर्षे दिल्लीमध्ये आहात, आपल्या दृष्टीमध्ये बदल करण्याची गरज आहे, असंही जगताप म्हणाले.