रायगडमधील इरशाळवाडी गावावर काळाने घातला घाला.. २७ जणांची सुटका..मृतांचा आकडा वाढण्याची भीती..

रायगडमधील इरशाळवाडी गावावर काळाने घातला घाला.. २७ जणांची सुटका..मृतांचा आकडा वाढण्याची भीती..

रायगड (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील इरशाळवाडी नावाच्या वसाहतीवर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातलाय. या भूस्खलनाच्या घटनेत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इरशाळवाडी हे गाव इर्शाळगडाच्या पायथ्याशी आहे.या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. परंतु ढिगाऱ्याखाली साधारण ४० ते ५० घरं असल्याची माहिती समोर येत आहे.

मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत २७ जणांना वाचवण्यात अलेल्यांपैकी २१ जणांवर नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. वाचवण्यात आलेल्या २५ जणांपैकी ४ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आता पुन्हा भूस्खलन होत असून अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत.

दरम्यान, राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल झाले आहेत

. पहाटेच मंत्री दादाजी भुसे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. मात्र सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे त्यांना वरपर्यंत जाता आलं नाही. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत.