बुलढाण्यात दुर्दैवी घटना : बकऱ्या चारताना पंधरा वर्षीय मुलाचा ...

बुलढाणा – ग्रामीण भागातील मुले लहानपणापासूनच निसर्गाशी एकरूप झालेली असतात. नदी, नाले, डोह हे त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असतो. मात्र कधी कधी हाच निसर्ग घातक ठरतो. असाच एक दुर्दैवी प्रकार अंढेरा गावात घडला आहे. बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना 15 जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली.
प्रणव केशव इंगळे, राहणार अंढेरा, हा मुलगा यंदा दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबाकडे चार-पाच बकऱ्या असून, प्रणव आपल्या वडिलांना बकऱ्या चारण्यास मदत करत असे. 15 जुलै रोजी त्याचे आई - वडील शेतात काम करत असताना तो एकटाच बकऱ्या घेऊन शेतात गेला होता.
सायंकाळी बकऱ्या घरी परतल्या, पण प्रणव घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. गावालगत असलेल्या नंदू सानप यांच्या शेताजवळील डोहाजवळ प्रणवच्या हातातील कुऱ्हाड काठावर पडलेली आढळली. गावकऱ्यांनी लोखंडी गळ टाकून शोध घेतला असता, त्याचे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, पीएसआय गजानन वाघ व फुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार, प्रणवचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला आणि पोहता न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी कोणीही नसल्यामुळे त्याला मदत मिळू शकली नाही.
या घटनेची नोंद अंढेरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. मृतदेह देऊळगाव मही येथील रुग्णालयात नेण्यात आला. एकुलत्या एका मुलाच्या निधनामुळे इंगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.