श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा येथे 30 ते 31 जुलै अखेर श्री क्षेत्र चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा संपन्न होत आहे. श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी. ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर मार्गावरील दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी. बस स्थानक रोड ते जुने एस.टी. स्टँड रोड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते पी. डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊस समोरील रोड ते यमाई मंदीर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या दरम्यानच्या मार्गावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1) (क) प्रमाणे सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई केली आहे.
या कालावधीत महाराष्ट्र व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर ये - जा करीत असतात. जोतिबा डोंगरावर येणा-या मोटार वाहनांची प्रचंड संख्या, वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटार वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची कोंडी, समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत, सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. याकरीता यात्रा काळात वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथे मोटार वाहनांची रहदारी आणि यात्रा कार्यक्रम सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी रहदारीचे नियमन करणे आवश्यक आहे.
30 जुलै रोजी 1 वाजल्यापसून ते 31 जुलै रोजी यात्रा संपेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही या अधिसुचनेत नमुद करण्यात आले आहे.