नव्वदीच्या दशकात उंब्रज परिसरातील गरोदर मातांच्या बाळंतपणात तहहयात झिजलेल्या कैवल्यमूर्ती शांता माऊली
आदरणीय कै.शांता आजींच्या जीवन कार्याचा आढावा घेताना कुटुंबीयांसह परिसराचे डोळे पाणावले; जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महनीय व्यक्तिमत्त्वाचा उचित सन्मान होणे गरजेचे
उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात
नव्वदीच्या दशकात उंब्रज परिसरातील हजारो गरोदर महिलांच्या बाळंतपणात सुईन म्हणून तहहयात झिजलेल्या कैवल्यमूर्ती शांता आजींच्या संपूर्ण जीवन कार्याचा आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा. दरम्यान,हा आढावा घेत असताना आजींच्या कुटुंबियांसह समाजातील काही घटकांना भेटत आजींच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करत होतो. त्यावेळी कुटुंबीयांसह परिसराचे,समाजातील घटकांचे डोळे आजींच्या आठवणीत पाणवल्याचे प्रकर्षाने जाणवले. आज ०८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महनीय व्यक्तिमत्त्वाचा उचित सन्मान होणे गरजेचे असल्याची तळमळ स्वस्त बसू देत नव्हती. . त्या तळमळीतून साकारलेला हा लेख प्रपंच. ..
कै. शांता आजींचा जन्म सन १९३२ साली कराड तालुक्यातील हनुमानगाव(पूर्वीची हनुमानवाडी)या उंब्रजपासून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या छोट्याशा खेडेगावात सर्वसामान्य कुटुंबात झाला.तर त्यांचे लग्न कळंत्रेवाडीस्थित सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कै. जगन्नाथ महादेव यादव यांच्याशी झाले. पूर्वी समाजातील सर्वच घटकांची परिस्थिती बेताचीच होती. परंतु, खिसे जरी रिकामे असायचे तरी मनाची श्रीमंती मात्र ओसंडून वाहत असे. प्रत्येक नात्यातील माणुसकी, जिव्हाळा व प्रेमाचा ओलावा टिकून होता. शांता आजींचा स्वभाव तसा समाजाभिमुख.. व सदैव इतरांप्रती सहाय्य तत्परतेने भरलेला.. आजींनी उंब्रज परिसरातील गरोदर मातांच्या बाळंतपणामध्ये सुईनपणाने तहहयात खर्ची घातलेले आयुष्य ही ईश्वराने त्यांना समाज उद्धारासाठी दिलेली देणगीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उंब्रजसह परिसरातील कळंत्रेवाडी,हनुमानवाडी,भवानवाडी चरेगाव,कालगाव या वाड्या-वस्त्या तसेच गावांमध्ये हजारो गरोदर मातांची बाळंतपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता यशस्वीपणे केल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात.आजच्या काळामध्ये बाळंतपणासाठी खाजगी हॉस्पिटल्समध्ये अक्षरश:लाखो रुपये खर्च करावे लागतात.पैसे जमवताना सर्वसामान्यांची दमछाक होते. मात्र नव्वदीच्या दशकातील शांता माऊलीने कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रसंगी आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करत बाळंतपणात अडलेल्या मातांना नवजीवन देण्याचा महायज्ञ सन २०१० पर्यंत अखंडपणे प्रज्वलित ठेवल्याचे वास्तव नाकारता येत नाही.दरम्यान, फक्त सुईनपणच नाही तर नवजात बाळांच्या पोटदुखीवर उपचार, बाळंतपणानंतरची मातेसह बाळाची मालिश करणं,आंघोळ घालणं यांसारखी सर्व सेवासुश्रूषा त्या करायच्या. हे सर्व करत असताना त्यांनी जातीभेद केला नाही. रात्री अपरात्री परिसरातून लोक बाळंतीण अडली असल्याचा निरोप घेऊन घरी येत असत. परंतु,क्षणाचाही विलंब न करता प्रसंगी कुटुंबाचाही विचार न करता तत्परतेने जात असत.कधी कधी तर जेवत्या ताटावरूनही उठून गेल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात.पुणे परिसरातील दांपत्य आपल्या बाळाच्या सततच्या पोटदुखीने त्रस्त होते. मुंबई पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून सुद्धा कुठेच गुण येत नसल्यामुळे तणावग्रस्त असलेल्या या कुटुंबाला शांता आजींबाबत माहिती लागली. त्यानंतर आजींचा शोध घेत ते कुटुंब कळंत्रेवाडीमध्ये दाखल झाले. आजींच्या मांडीवर बाळ देताच दहा मिनिटातच आजींनी बाळाची पोटदुखी कायमची घालवली. त्या दांपत्याने अक्षरशः आजींचे पाय पकडले. मुंबई पुण्याचे डॉक्टर करून जवळपास एक लाख रुपये खर्च झाला असून निदान दहा हजार रुपये तरी तुम्ही ठेवा अशी विनवणी करत आजींच्या हातावरती दहा हजार रुपये टेकवताच आजींनी हात जोडत पैसे घेण्यास नम्रपणे नकार देऊन बाळाची असाध्य पोटदुखीतून मुक्तता झाली हीच माझी खरी कमाई असल्याचे आजी बोलल्याचा प्रसंग सांगताना कुटुंबीयांचे डोळे पाणावले. महाबळेश्वर येथूनही काही दांपत्य आपल्या मुलांच्या पोटदुखी वरती उपचार करण्यासाठी आजींकडे येत असतं. दरम्यान, सन २०१० साली घरामध्येच आजी पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. पायावरती उपचार सुरू होते.परंतु,पायाचे दुखणे दिवसेंदिवस वाढतच होते. तरीसुद्धा त्या अवस्थेतही शांता आजी पोटदुखीने त्रस्त असलेल्या मुलांवरती घरामध्येच उपचार करीत असत.आजींनी हाती घेतलेले गरोदर महिलांच्या बाळंतपणातील सुईनपण तसेच सेवेचे व्रत अखेरच्या श्वासापर्यंत टिकवले. वृद्धापकाळामुळे शांता आजींचे शरीर त्यांना साथ देत नव्हते.पायाचे दुखणे अधिकच बळावत होते.त्यातच जवळपास ८३ वर्ष अखंडपणे समाजसेवेचा धगधगता यज्ञ अखेर ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी शांत झाला. गरोदर मातांच्या वेदनांना सहवेदना मानून अखंडपणे झिजलेल्या "शांता"पर्वाचा अस्त झाल्याच्या भावना उंब्रज परिसरातून व्यक्त होत आहेत.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने थोर व्यक्तिमत्व,कैवल्यमूर्ती कै शांताबाई जगन्नाथ यादव यांना माझी शब्दसुमनांजली