प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा
नवीन शैक्षणिक धोरणामुळेच विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने विकास होईल

रोहित पास्ते / मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जनजागृती सप्ताह निमित्ताने नवीन शैक्षणिक धोरणावर सविस्तर चर्चा नुकतीच संपन्न झाली. 

प्रथम सत्रात महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. डॉ. सत्यवान बनसोडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास नवीन शैक्षणिक धोरणामुळेच होणार आहे. व्यावसायिक शिक्षण व कौशल्यावर आधारित शिक्षण यांचा समावेश नवीन शैक्षणिक धोरणात आहे. विद्यार्थ्यांची इच्छा, आवड व कुवतीनुसार विभिन्न विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

द्वितीय सत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नामदेव आडनाईक यांनी नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्ता पूर्ण शिक्षण हाच केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. यामध्ये स्थानिक भाषेचा अभ्यास करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध असल्याचेही सांगितले. रोजगारभिमुख शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे असे ते आपल्या भाषणात म्हणाले. 

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन .घोलप हे होते ते आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की अन्य देशाच्या तुलनेत भारतीय विद्यार्थी कमी पडू नये या  उद्देशानेच नवीन शैक्षणिक धोरण भारत सरकारने स्वीकारले आहे. विविध  विषयाच्या अभ्यासानेच विद्यार्थी प्रगल्भ होणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरणार आहे. सदर वेळी वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. आर. एस. सुतार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे औचित्य साधून भीत्तीपत्रिके चे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. एस.पी. बनसोडे यांनी केले. तर आभार प्रा. क्षितिज खरात यांनी मानले. सूत्रसंचालन प्राध्यापिका सुरेखा फडतरे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.