सौंदर्यामुळे 'या' मालिकेतील काम नाकारलं गेलं – अभिनेत्री जान्हवी किल्लेकर

सौंदर्यामुळे 'या' मालिकेतील काम नाकारलं गेलं  – अभिनेत्री जान्हवी किल्लेकर

मुंबई - ‘बिग बॉस मराठी’ च्या मंचावरून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आज मराठी टेलिव्हिजन विश्वात एक ओळख निर्माण करत आहे. जान्हवीने एका मुलाखतीत म्हणाली, "२०१२ साली स्टार प्रवाहवरील ‘एक नंबर’ या मालिकेसाठी मी अनेक वेळा ऑडिशन्स दिल्या होत्या. पण नकार मिळाला तो केवळ या कारणामुळे की मी मुख्य अभिनेत्रीपेक्षा जास्त सुंदर दिसते. त्यांना वाटलं की, हिरोईनच्या बहिणीच्या भूमिकेसाठी मी जास्त उठून दिसते, त्यामुळे त्यांनी मला नाकारलं. केवळ सौंदर्यामुळे नाकारलं गेलं, ही गोष्ट माझ्या मनाला लागली."

जान्हवी पुढे म्हणाली, माझ्या डोळ्यांमुळे लोकांना मी ‘व्हिलन’ वाटते. का माहित नाही, पण आतापर्यंत सगळ्या नकारात्मक भूमिका माझ्याकडेच आल्या. सुंदर दिसणं जर दोष असेल, तर ते खूप दुखावणारं आहे. तिने ऑडिशनदरम्यान आलेल्या अनुभवांचीही आठवण सांगितली. "रोज सेटवर जायचं, नवे लुक्स ट्राय करायचे, ऑडिशन्स द्यायच्या आणि शेवटी सांगतात की तू निवडली गेली नाहीस. मग आधीच सांगायचं ना.. मी चेहरा लपवून सेटवर गेले नव्हते."

तिला प्रश्न विचारण्यात आला की, तुला दुनियादारी कोणी शिकवली? त्यावर जान्हवी म्हणाली, "मी अजून शिकतच आहे. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने मला खूप काही शिकवलं. मोठ्या कलाकारांसोबत काम करताना त्यांचं वागणं, काम करण्याची पद्धत, एक कलाकार म्हणून स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत. हे सर्व काही या मालिकेने शिकवलं."

आवाजावरून टीका, पण आता काम करून सुधारणा - 

जान्हवीने तिच्या आवाजासंबंधीच्या टीकांबाबतही भाष्य केलं. "लोक म्हणायचे की मी नाकातून बोलते. त्यामुळे मी माझ्या आवाजावर खूप काम केलं. आता कोणताही सीन करताना सर्वात आधी मी माझ्या आवाजाकडे लक्ष देते. ही गोष्ट माझ्या मनाला फार लागली होती," असं ती म्हणाली.