'या' सीनमुळे पुष्पा 2 वादात, काँग्रेस आमदाराने दाखल केली तक्रार
मुंबई: पुष्पा २ या सिनेमाने करोडो रुपयांचा गल्ला जमवला आहे. परंतु या चित्रपटाच्या मागील संकटं संपण्याचे नाव घेत नाहीये. चित्रपटातील एका सीनबाबत काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे आमदार थेनमार मल्लन्ना यांनी आक्षेप घेतला आहे. अल्लू अर्जुन आणि 'पुष्पा २: द रुल'चे निर्माता आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन तसेच प्रॉडक्शन टीमवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
थेनमार मल्लन्ना यांनी आपल्या तक्रारीत 'पुष्पा २' मधील एका सीनवर आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये 'पुष्पा' एका पोलिस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत स्विमिंग पूलमध्ये लघूशंका करताना दाखवला आहे.
'तो' सीन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा
काँग्रेस नेत्याने तो सीन अपमानास्पद आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अल्लू अर्जुन तसेच चित्रपटाच्या निर्मात्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या पात्रांचे आक्षेपार्ह चित्रीकरण थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निर्मात्यांनी केली महिलेच्या कुटुंबाला ५० लाखांची आर्थिक मदत
दुसरीकडे, 'पुष्पा २' च्या निर्मात्यांनी ४ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या महिलेच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी महिलेच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली.