सलमान खानला धमकी देणाऱ्या तरूणाला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तींकडून धमकी देण्यात आली होती. यावेळी बॉम्बने उडवण्याची धमकी सलमान खानला त्या अज्ञात व्यक्तीने दिली. ट्रॅफिक पोलिस विभागाला व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज मिळाला होता, ज्यामध्ये त्याची कार बॉम्बने उडवून देण्याची आणि घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती.
त्याचबरोबर, वरळी पोलिस ठाण्यातही एक कॉल आला होता. त्या फोन कॉलच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धमकी केसमध्ये २६ वर्षीय एका तरुणाला गुजरातच्या वडोदरामधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरूणाची मानसिक स्थिती ठिक नाही. लवकरच, मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.