Beed Crime : ध्वनी प्रदूषणाची तक्रार केल्याने महिला वकिलाला सरपंचाने केली मारहाण , पाईपच्या माराने अंग काळनिळं पडलं

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एका महिला वकिलावर अमानुष हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वनी प्रदूषणाची तक्रार केल्याने गावातील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी या वकिल महिलेवर जबर हल्ला करून तिला पाईप आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे अंग काळेनिळं पडले असून, ती काही काळासाठी बेशुद्ध झाली होती.
ही वकिल महिला अंबाजोगाई सत्र न्यायालयात कार्यरत आहे. तिने घरासमोर सुरू असलेल्या लाऊडस्पीकर व पिठाच्या गिरण्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिला गावातील शेतात घेऊन जाऊन, सरपंच व त्याच्या दहा कार्यकर्त्यांनी रिंगण करून जेसीबीच्या पाईपने आणि काठ्यांनी मारहाण केली.
या प्रकाराची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत दिली. त्यांच्या पोस्टमुळे या घटनेवर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. आव्हाड यांनी विचारले, “दहा पुरुष मिळून एका महिला वकिलाला मारतात आणि कोणीही काहीच करत नाही हा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे? त्याचा गावातला प्रभाव किती?”
आव्हाड यांच्या पोस्टनंतर या प्रकरणात नव्याने हालचाली सुरू झाल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. पीडितेला एका रात्रीच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असून, तिच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत आहे.
बीड जिल्ह्यात याआधीही गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटनांमुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.